सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. ८व्या केंद्रीय वेतन आयोगात (8th Pay Commission) आता ‘परफॉर्मन्स बेस्ड फॉर्म्युला’ लागू करण्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. म्हणजेच, ज्यांची कामगिरी चांगली, त्यांनाच जास्त वेतनवाढ मिळणार आहे.
सध्याचा ७वा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू असून, त्याची मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपणार आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२६ पासून नवा वेतन आयोग लागू होणार आहे. मात्र, शिफारशी अंमलात आणण्यास थोडा विलंब होऊ शकतो, तरी कर्मचाऱ्यांना थकबाकीचा लाभ मिळणार आहे.
या नव्या आयोगात वेतनरचना, भत्ते, बोनस आणि पेन्शन योजनांचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. तीन सदस्यीय समिती हे सर्व घटक तपासून सरकारला १८ महिन्यांत अहवाल सादर करेल.
नव्या फॉर्म्युल्यानुसार, उत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक वाढ आणि दुर्लक्ष करणाऱ्यांना कमी वाढ मिळण्याची शक्यता आहे. शासनाच्या अधिसूचनेनुसार, हा आयोग केवळ पगारवाढीसाठी नव्हे, तर शासकीय नोकऱ्या अधिक आकर्षक आणि स्पर्धात्मक करण्यासाठी काम करणार आहे.
आयोगात केंद्र सरकारी कर्मचारी, संरक्षण दलाचे सदस्य, अखिल भारतीय सेवा अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, तसेच केंद्रशासित प्रदेशातील अधिकारी समाविष्ट असतील. याशिवाय कालबाह्य भत्ते रद्द करून नव्या सुविधा जोडल्या जातील.
तसेच पेन्शन, ग्रॅच्युटी आणि NPS अंतर्गत नियमांमध्ये सुधारणा सुचवली जाणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे या आयोगाच्या शिफारशी कशा असतील, याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.