केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगाच्या कामकाजाला आता अधिक गती मिळाली असून समितीवर नव्या संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पगारवाढ आणि पेन्शनवाढीच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने नव्या संचालकांच्या नियुक्तीस मंजुरी दिली आहे. कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे लेखा सेवा (IRAS, २००९ बॅच) अधिकारी कृष्णा व्ही. आर. यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाअंतर्गत करण्यात आली असून ते आता आठव्या वेतन आयोगाच्या समितीत महत्त्वाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
याचबरोबर आणखी एक मोठे अपडेट म्हणजे आयोगासाठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पगारवाढ, पेन्शनवाढ तसेच फिटमेंट फॅक्टर संदर्भात आपली मते व सूचना नोंदवता येणार आहेत. १६ मार्च २०२६ पर्यंत या सूचना सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, अर्थ राज्यमंत्री Pankaj Chaudhary यांनी संसदेत माहिती देताना सांगितले की आयोगाची अधिसूचना ३ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आली होती. आयोगाला शिफारसी सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून २०२७ पर्यंत अंतिम शिफारसी जाहीर होण्याची शक्यता आहे.
एकूणच, आठव्या वेतन आयोगाच्या हालचालींना वेग आल्याने केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Comments are closed.