राज्यातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने मेगाभरतीची घोषणा करत शिक्षण विभागातील तब्बल ८ हजार शिक्षक पदांसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ही भरती ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून केली जाणार असून, या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव Ranjitsingh Deol यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद व खासगी शिक्षण संस्थांमधील रिक्त पदे पवित्र पोर्टलद्वारेच भरली जातील. खासगी संस्थांना भरतीपूर्वी त्यांच्या रिक्त पदांचे रोस्टर (बिंदूनामावली) मागासवर्गीय कक्ष व विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्रमाणित करून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच, केवळ पवित्र पोर्टलमार्फत भरलेल्या पदांनाच शासनाची मान्यता व वेतन लागू होणार आहे.
नवीन नियमांनुसार उमेदवारांना भरती प्रक्रियेत कमाल ५० पदांसाठी प्राधान्यक्रम नोंदवता येतील. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार उमेदवाराचे वय निश्चित केले जाईल. तसेच, या चाचणीतील गुण फक्त एकदाच निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जातील. पुन्हा संधी हवी असल्यास उमेदवारांना नवीन परीक्षा द्यावी लागेल.
याशिवाय, उमेदवारांना मुलाखतीसह व मुलाखतीशिवाय दोन्ही प्रकारच्या पदांसाठी अर्ज करता येणार असून, पात्रतेनुसार सर्व पर्याय उपलब्ध असतील. मात्र, त्यापैकी जास्तीत जास्त ५० प्राधान्यक्रम निवडण्याची मर्यादा असेल.
पहिली ते पाचवी वर्गासाठी सेमी-इंग्रजी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता पूर्ण केलेली असणे आवश्यक करण्यात आले आहे. संबंधित प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध नसल्यास, इतर पात्र उमेदवारांना संधी देण्यासाठी नवीन जाहिरात काढली जाईल.
या सर्व बदलांमुळे शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुसूत्र आणि स्पर्धात्मक होणार असून, हजारो उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे.

Comments are closed.