राज्य सरकारनं आता प्राध्यापक भरतीसाठी नवा मापदंड ठरवला आहे. शैक्षणिक पात्रता, अध्यापनाचा अनुभव आणि संशोधन कार्यासाठी ७५ गुण, तर मुलाखतीसाठी २५ गुण असा गुणविभाग ठेवण्यात आलाय. या ७५ गुणांपैकी किमान ५० गुण मिळालेला उमेदवारच मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहे.
या नव्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांनी पुन्हा अर्ज मागवले असून २१ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. विशेष म्हणजे, पूर्वी अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांनाही आता नव्याने अर्ज सादर करावा लागणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कुलसचिव, अधिष्ठाता आणि प्राध्यापक अशी एकूण आठ पदं भरली जाणार आहेत. या पदांसाठी यापूर्वी दोनदा जाहिरात प्रसिद्ध झाली होती, पण भरती प्रक्रियेला गती मिळाली नव्हती. आता शासनानं ६ ऑक्टोबरला घेतलेल्या नव्या निर्णयानंतर भरतीची प्रक्रिया नव्या सूत्रांनुसार सुरू झाली आहे.
नवीन निकषांमध्ये पीएच.डी. करणाऱ्या विद्यापीठाचं रँकिंग, संशोधन प्रकल्प, पेटंट, पब्लिकेशन्स आणि अध्यापन अनुभव या घटकांना महत्त्व देण्यात आलं आहे. मात्र या सर्व निकषांची पूर्तता करून ७५ पैकी ५० गुण मिळवणे कठीण असल्याने अनेक उमेदवार चिंतेत आहेत.
सध्या विद्यापीठातील विविध विभागांचे संचालक आणि प्राध्यापक प्रभारी किंवा कंत्राटी स्वरूपात काम पाहत आहेत. त्यामुळे या नव्या भरती प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष लागले आहे. इच्छुक उमेदवारांनी नव्या निकषांनुसार अर्ज करून पात्रता सिद्ध करणे आवश्यक आहे, कारण मुलाखती जानेवारी महिन्यात पार पडण्याची शक्यता आहे.

Comments are closed.