राज्य सरकारमध्ये लवकरच सुमारे 70 हजार पदांसाठी नोकरभरती होणार असल्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामध्ये 50 हजार पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) तर उर्वरित 20 हजार पदे इतर शासकीय यंत्रणांद्वारे भरली जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात असून, लवकरच अधिकृत प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्यासंदर्भातील निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार असून, त्यातून प्रशासन अधिक गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याचा सरकारचा मानस आहे. सामान्य प्रशासन विभागाने तयार केलेल्या नव्या सुधारणा मॉडेलनुसार राज्यातील प्रशासकीय कार्यपद्धती अधिक सक्षम करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाचे मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत विशेष प्रशंसनीय ठरले आहे. इतकेच नव्हे, तर इतर राज्यांनीही हे मॉडेल स्वीकारावे, असे निर्देश पंतप्रधानांनी दिल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रशासकीय सुधारणांमुळे नागरिकांना शासकीय सेवा अधिक सोप्या, जलद आणि दर्जेदार पद्धतीने मिळणार आहेत. ‘आपले सरकार’ व ‘महाडीबीटी’ पोर्टलवरील सेवा अधिक सुलभ करण्यात येणार असून, १०७४ सेवांचे सुसूत्रीकरण केले जाणार आहे. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १७,६२४ सेवा केंद्रांपैकी निवडक केंद्रांना ‘स्मार्ट केंद्र’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे.

Comments are closed.