पालिका उपायुक्तांची ७ पदे रिक्त; कार्यरत उपायुक्तांवर वाढता ताण ! वसई-विरार महापालिकेतील १४ पैकी ७ उपायुक्तांची पदे रिक्त असल्याने सध्या कार्यरत उपायुक्तांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. यामुळे प्रत्येक उपायुक्तांकडे १२ ते १५ विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
२००९ मध्ये वसई-विरार महापालिका स्थापन झाली आणि २०१४ मध्ये तिचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला. त्यानुसार, २,८५३ पदे मंजूर करण्यात आली, ज्यामध्ये १४ उपायुक्तांचा समावेश होता. मात्र, सध्या फक्त ७ उपायुक्त प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत, तर एक उपायुक्त वैद्यकीय रजेवर आहेत. परिणामी, कमी उपायुक्तांवर अधिक जबाबदाऱ्या आल्यामुळे प्रशासनाचा गतीमान कारभार करण्यास अडथळे निर्माण होत आहेत.
नानासाहेब कामठे आणि समीर भूमकर यांच्यावर प्रत्येकी १२ ते १५ विभागांचे दायित्व सोपवण्यात आले आहे. नियमित बैठका, शासकीय कार्यक्रम, विविध विभागांचे उपक्रम, नागरिकांच्या तक्रारी आणि कार्यालयीन कामांमुळे प्रत्येक विभागाला पुरेसा वेळ देता येत नाही, अशी खंत काही उपायुक्तांनी व्यक्त केली आहे.
पालिकेतील उपायुक्त पदे शासनाद्वारे प्रतिनियुक्तीवर भरली जातात. या रिक्त पदांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे उपायुक्त सदानंद पुरव यांनी सांगितले.
सध्या कार्यरत उपायुक्त:
अजित मुठे
सुभाष जाधव
दिपक सावंत
नानासाहेब कामठे
समीर भूमकर
अर्चना दिवे
सदानंद पुरव
दिपक झिंजाड (रजेवर)