सीमा सुरक्षा दलात (BSF) कॉन्स्टेबल भरतीसाठी माजी अग्निवीरांसाठी आरक्षणात मोठी वाढ करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने १८ डिसेंबर रोजी जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार, हे आरक्षण आता १० टक्क्यांवरून थेट ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे.
या निर्णयासाठी BSF जनरल ड्युटी कॅडर (नॉन-गजेटेड) भरती नियम, २०१५ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील भरतीत माजी अग्निवीरांसाठी राखीव असलेल्या ५० टक्के जागा नोडल फोर्समार्फत भरल्या जाणार आहेत. उर्वरित तसेच रिक्त राहिलेल्या जागा दुसऱ्या टप्प्यात SSC कडून भरल्या जातील.
वयोमर्यादेतही सवलत देण्यात आली असून, पहिल्या तुकडीतील माजी अग्निवीरांना ५ वर्षे, तर पुढील तुकड्यांना ३ वर्षांची सूट मिळणार आहे. विशेष म्हणजे, माजी अग्निवीरांना शारीरिक मानक व कार्यक्षमता चाचणीतून सूट देण्यात आली असून, मात्र त्यांना लेखी परीक्षा देणे बंधनकारक असेल.
दरवर्षी महिलांसाठी किती जागा ठेवायच्या याचा निर्णय BSF चे महासंचालक घेणार आहेत. अग्निवीर भरतीसाठी वय १७.५ ते २१ वर्षे आणि किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. चार वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या १०वी उत्तीर्ण अग्निवीरांना १२वी समकक्ष प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

Comments are closed.