मुंबईतील केईएम, सायन आणि नायर या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये तब्बल ४५ टक्के पदे रिक्त असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या रिक्त जागांमध्ये प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, तंत्रज्ञ, परिचारिका, सफाई कर्मचारी आणि वॉर्ड अटेंडंट्स यांचा समावेश आहे.
या अभावामुळे रुग्णसेवेवर ताण वाढला असून, कार्यरत कर्मचाऱ्यांवर दुहेरी जबाबदारी येत आहे. ही आकडेवारी सार्वजनिक आरोग्य हक्क मोहिमेने जाहीर केली आहे.
मोहिमेने स्पष्ट केले की, रुग्णालयांचे खाजगीकरण (PPP मॉडेल) करण्याऐवजी महापालिकेने रिक्त पदे तत्काळ भरून सार्वजनिक आरोग्य सेवा मजबूत करणे आवश्यक आहे.
केईएम, सायन आणि नायर या तिन्ही रुग्णालयांमध्ये एकूण १,०१७ मंजूर पदांपैकी केवळ ४७३ पदे कायमस्वरूपी भरलेली आहेत.केईएम रुग्णालयातच १०६ प्राध्यापक पदांपैकी ४० रिक्त आहेत, तर सायनमध्ये ९९ पैकी ५४ आणि नायरमध्ये ७८ पैकी ३१ पदे रिक्त आहेत.
याशिवाय प्रयोगशाळा सहाय्यक, एक्स-रे तंत्रज्ञ, आया, परिचारिका आणि सफाई कामगारांच्या शेकडो पदांवर भरती झालेली नाही. त्यामुळे रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांची तीव्र कमतरता आणि रुग्णसेवेत विलंब जाणवत आहे.
दरवर्षी बीएमसीच्या वैद्यकीय महाविद्यालयांतून १,२०० एमबीबीएस आणि १,००० पीजी डॉक्टर पदवीधर होतात. जर त्यांनाच स्थानिक रुग्णालयांत नेमलं गेलं, तर मोठा प्रश्न सुटू शकतो. परंतु, प्रशासनाने कंत्राटी भरतीवर भर दिल्याने सामान्य रुग्णांवर अन्याय होत असल्याचे आरोग्य मोहिमेचे मत आहे.

Comments are closed.