देशातील तरुण पदवीधरांच्या रोजगारस्थितीबाबत चिंताजनक चित्र समोर आले आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या ‘स्टेट ऑफ वर्किंग इंडिया’ अहवालानुसार, भारतातील २० ते २९ वयोगटातील सुमारे ६.३ कोटी पदवीधरांपैकी १.१ कोटी जण बेरोजगार आहेत.
या अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, वर्षभरात खूपच कमी टक्के पदवीधरांना स्थिर व पगारी नोकरी मिळते. विशेष म्हणजे, बेरोजगारांमध्ये १५ ते २५ वयोगटातील पदवीधरांचे प्रमाण तब्बल ४०% आहे, तर २५ ते २९ वयोगटात हे प्रमाण २०% आहे.
पदवीधरांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्यानुसार नोकऱ्या उपलब्ध होत नसल्याने ही समस्या अधिक तीव्र होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षांत उच्च शिक्षणात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी रोजगाराच्या संधी त्याच प्रमाणात वाढलेल्या नाहीत.
याशिवाय, कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी शिक्षण अर्धवट सोडणाऱ्यांचे प्रमाण २०१७ मधील ५८% वरून २०२३ मध्ये ७२% पर्यंत वाढले आहे. तर शिक्षण घेणाऱ्या तरुण पुरुषांचे प्रमाणही घटले आहे.
अहवालात असेही नमूद केले आहे की, पदवीधरांचे सुरुवातीचे पगार जरी इतरांपेक्षा जास्त असले तरी अलीकडच्या काळात पगारवाढीचा वेग कमी झाला आहे. दरवर्षी सुमारे ५० लाख पदवीधर बाहेर पडतात, पण त्यापैकी केवळ २८ लाखांना नोकरी मिळते, ही बाब चिंतेची ठरत आहे.

Comments are closed.