नाशिक विभागातील दहावी व बारावी बोर्ड परीक्षांसाठी राज्य मंडळाने प्रत्येक परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य केले आहेत. मात्र, अंमलबजावणीच्या आढाव्यात धक्कादायक माहिती पुढे आली आहे—विभागातील तब्बल ३९९ परीक्षा केंद्रांवर एकाही वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा नाही. यामुळे संबंधित शाळांना तातडीने सर्व वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही बसवावा लागणार आहे.

नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांमध्ये एकूण ७६७ परीक्षा केंद्रे असून, त्यापैकी केवळ २१९ केंद्रांमध्येच पूर्ण सीसीटीव्ही सुविधा आहे. दहावीच्या २६३ आणि बारावीच्या १३६ केंद्रांवर अजूनही सीसीटीव्ही नाही. तर १४९ परीक्षा केंद्रांमध्ये काही वर्गातच कॅमेरे आहेत, ज्यामुळे ती सुविधा अपुरी आहे. परीक्षा दरम्यान गैरप्रकार रोखणे आणि परीक्षागृहातील हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही अनिवार्य असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षी मंडळाने केवळ सूचना दिली होती; पण या वर्षी सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक केल्यामुळे शाळांवर मोठा आर्थिक भार येणार आहे. सरकारकडून कोणतेही वतनेतर अनुदान मिळत नसल्याने कॅमेऱ्यांचा खर्च शिक्षण संस्थांनाच उचलावा लागणार आहे. त्यामुळे अनेक शाळा आर्थिक अडचणीतून हे काम कसे पूर्ण करणार, याकडे लक्ष लागले आहे.
मंडळाचे विभागीय अध्यक्ष सुभाष बोरसे यांनी सांगितले की, परीक्षेदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून तीन महिने आधीच सर्व परीक्षा केंद्रांना सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्याध्यापक सभांमध्येही कॅमेरे बसविण्याच्या सूचना कडकपणे देण्यात आल्या आहेत.
जिल्हानिहाय सीसीटीव्ही नसलेली केंद्रे (दहावी – बारावी):
- नाशिक: १०९ – ५२
- धुळे: २६ – १६
- जळगाव: ९८ – ५५
- नंदुरबार: १३ – ३०
आगामी बोर्ड परीक्षांपूर्वी या सर्व केंद्रांवर सीसीटीव्हीची सोय पूर्ण होईल का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Comments are closed.