महाराष्ट्र राज्य शासनातील मंत्रालयासह विविध विभागांमध्ये सुमारे तीन लाख पदे रिक्त असल्याची माहिती थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. सांगोलेचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही बाब स्पष्ट झाली.
सध्या शासनाच्या विविध विभागांमध्ये मंजूर असलेल्या सुमारे 8.18 लाख पदांपैकी 36 टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. या रिक्त जागांमुळे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार वाढत असून, अनेक ठिकाणी एकाच अधिकाऱ्याकडे दोन-तीन पदांचा अतिरिक्त पदभार असल्याचे चित्र आहे. खालच्या संवर्गात भरती न झाल्याने पदोन्नती रखडत असून काही कर्मचाऱ्यांना 10–12 वर्षे एकाच पदावर काम करावे लागत आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ऑगस्ट 2022 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत शासनाने 1.20 लाखांहून अधिक नियुक्त्या केल्या आहेत. मात्र सेवानिवृत्ती आणि नवीन पदनिर्मितीमुळे रिक्त पदांची संख्या मोठीच आहे. भरती प्रक्रिया ही सातत्याने सुरू असते व पदोन्नती तसेच सरळसेवा मार्गाने नियुक्त्या केल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात 30 लाखांपेक्षा अधिक उमेदवार स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असणे बेरोजगारी वाढवणारे असल्याची भावना उमेदवारांमध्ये आहे. ही पदे तातडीने भरावीत, अन्यथा याचा फटका शासनाला आगामी काळात बसू शकतो, असा इशारा स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.

Comments are closed.