महाराष्ट्रातील सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असून ती लवकरच भरली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, सध्या राज्य शासनाच्या खात्यांमध्ये एकूण २ लाख ९९ हजार ५१ पदे रिक्त आहेत. प्रशासनाची कामकाज यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी ही पदे टप्प्याटप्प्याने भरण्यात येणार आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
हिवाळी अधिवेशनात विचारण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात त्यांनी सांगितले की, राज्यातील एकूण मंजूर पदसंख्या ८ लाख ११ हजार ५०३ इतकी असून त्यापैकी सुमारे ३६.५४ टक्के जागा रिक्त आहेत. ही सर्व पदे प्रामुख्याने सरळ सेवा भरतीद्वारे भरली जाणार आहेत.
या भरतीसाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच विविध शासकीय विभागांच्या भरती जाहिराती जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे, तर प्रशासनालाही आवश्यक मनुष्यबळ मिळणार आहे.

Comments are closed.