रत्नागिरी जिल्हा सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात दीर्घकाळ प्रलंबित असलेली पदभरती अखेर मार्गी लागली आहे. तब्बल २७१ जागा भरल्या जाणार असून, पहिल्या टप्प्यात लिपिक व तांत्रिक पदांची कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
सध्या रुग्णालयात १४० पदे रिक्त असल्यामुळे काही मोजक्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण पडत होता. या रिक्त पदांमुळे उपचारांची जबाबदारी मर्यादित कर्मचाऱ्यांवर येत होती. पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेत, शासनस्तरावर पाठपुरावा केल्यानंतर भरतीस हिरवा कंदील मिळाला आहे.
या पदांमध्ये वैद्यकीय समाजसेवक, परिचारिका, लॅब टेक्निशियन, क्ष-किरण तंत्रज्ञ, औषधनिर्माता, लिपिक, वाहनचालक यांसारखी विविध पदे आहेत. वैद्यकीय महाविद्यालयात २५ आणि जिल्हा रुग्णालयात २४६, अशा एकूण २७१ जागा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा असून रोज मोठ्या प्रमाणावर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या होत आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब रुग्णांना जिल्ह्यातच उपचार मिळत आहेत आणि कोल्हापूरला जाण्याची गरज कमी झाली आहे.
आता या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या भरतीमुळे रत्नागिरीसह कोकणातील तरुणांना घरच्या जिल्ह्यातच रोजगार मिळणार आहे.