तीनशे जागांसाठी तब्बल १९ हजार अर्ज; राज्यभर १३ केंद्रांवर परीक्षा! | 19,000 Applications for 300 Posts!

19,000 Applications for 300 Posts!

महापालिकेतील रखडलेली नोकरभरती अखेर मार्गी लागली असून अवघ्या ३०० पदांसाठी तब्बल १९ हजार अर्ज दाखल झाले आहेत. तांत्रिक संवर्गातील ११४ अभियंता पदे आणि अग्निशमन विभागातील १८६ वाहनचालक व फायरमन पदांसाठी २४ व २५ फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा ‘टीसीएस’मार्फत पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्यात येणार असून नाशिकसह राज्यातील १३ ठिकाणी परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

19,000 Applications for 300 Posts!

महापालिकेत सध्या मंजूर असलेल्या ७,७२५ पदांपैकी सुमारे ३,८०० पदे रिक्त आहेत. सुधारित आकृतिबंधास शासनाची मान्यता अद्याप मिळालेली नसली तरी मनुष्यबळाची तीव्र टंचाई लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी परीक्षेची तयारी पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे.

१४ वर्षांनंतर होत असलेल्या या भरतीमुळे उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे. काही पदांसाठी केवळ बारावी उत्तीर्ण ही किमान अट असतानाही पदव्युत्तर आणि उच्चशिक्षित उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज केले आहेत. यामुळे सरकारी नोकरीकडे तरुणाईचा वाढता ओढा आणि बेरोजगारीचे वास्तव अधोरेखित झाले आहे.

महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवली जात असून, सिंहस्थपूर्व तयारीच्या दृष्टीने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. लेखी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.

Comments are closed.