महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेनंतर रखडलेली नोकरभरती अखेर गतीमान झाली आहे. राज्य शासनाने मंजुरी दिलेल्या तांत्रिक संवर्गातील अभियंते ११४ पदे आणि अग्निशमन विभागातील वाहनचालक व फायरमनची १८६ पदे अशा एकूण ३०० पदांच्या भरतीसाठी तब्बल १९ हजार ४०० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. एका पदासाठी सरासरी ६५ उमेदवार स्पर्धेत असल्याचे चित्र असून, या भरतीकडे तरुणांचे मोठे लक्ष वेधले गेले आहे.

सर्व अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, या भरतीसाठी टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) मार्फत २४ व २५ फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त (प्रशासन) लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली. राज्यातील १० ते ११ केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, परीक्षेच्या आठ दिवस आधी ऑनलाइन प्रवेशपत्र उमेदवारांच्या लॉगिन आयडीवर उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
नाशिक महापालिकेत सध्या अ ते ड संवर्गातील ७,७२५ पदे मंजूर असून, त्यापैकी जवळपास ३,८०० पदे रिक्त आहेत. लोकसंख्या वाढ लक्षात घेता महापालिकेने यापूर्वी १४,९४४ पदांचा आकृतिबंध शासनाकडे सादर केला होता. त्यानंतर सर्व विभागांचा आढावा घेऊन महासभेच्या मान्यतेने ९,०१६ पदांचा सुधारित आकृतिबंध सादर करण्यात आला; मात्र अद्याप त्यास शासनाची मान्यता मिळालेली नाही.
महापालिकेत सध्या केवळ सुमारे चार हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत असल्याने मनुष्यबळाचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नोकरभरती आवश्यक असल्याने ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जात असल्याचे महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली टीसीएसमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments are closed.