नागपूरच्या औद्योगिक क्षेत्रात मोठी भर पडत आहे. दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग अँडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशन या कंपनीने १,७४० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभाग आणि या कंपनीदरम्यान सामंजस्य करार झाला असून, हा करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
हा प्रकल्प बुटीबोरी, नागपूर येथे उभारला जात असून, यामुळे ४०० स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात अजून अनेक मोठे प्रकल्प गुंतवणुकीसाठी येतील, यावर माझा पूर्ण विश्वास आहे.”
समारंभातील मान्यवरांची उपस्थिती
हा करार सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्री सचिव डॉ. श्रीकर परदेशी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, उद्योग विभागाचे सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार आणि ह्युसंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सी इयान ली आदी मान्यवर उपस्थित होते.
ह्युसंग कंपनीबद्दल माहिती
ह्युसंग समूह ही एक नामांकित दक्षिण कोरियन कंपनी असून, टेक्सटाईल्स, केमिकल्स, अवजड उद्योग, आयटी आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात कार्यरत आहे. कार्बन फायबर, टायर कॉर्ड, ऑटोमोटिव्ह सीट बेल्ट यार्न यांसारख्या उत्पादनांमध्ये कंपनी अग्रणी आहे.
ह्युसंग कॉर्पोरेशन इंडिया प्रा. लि.ची हरियाणा, मुंबई, पुणे आणि चेन्नई येथे कार्यालये आहेत. पुण्यात २०१५ पासून कंपनी कार्यरत असून, ३५० कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच, २०१८ पासून छत्रपती संभाजीनगर (औरिक-शेंद्रा) येथेही कंपनीची मोठी गुंतवणूक आहे आणि ५०० कर्मचारी कार्यरत आहेत.
ही गुंतवणूक नागपूरच्या औद्योगिक वाढीला चालना देईल आणि स्थानिकांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देईल