डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन, अमरावती विभागाने मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर करून राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांतील रिक्त प्राध्यापक पदांची तातडीने भरती करण्याची मागणी केली आहे.
संघटनेच्या माहितीनुसार, सध्या राज्यातील १२,२५३ पेक्षा जास्त प्राध्यापक पदे रिक्त आहेत. अकृषी विद्यापीठांमध्ये जवळपास अर्धी पदे रिक्त आहेत तर अनुदानित महाविद्यालयांमध्ये तब्बल ११ हजाराहून अधिक पदे भरलेली नाहीत.
२०१७ पासून या भरतीला विलंब होत असल्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले आहेत. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी रचना (NIRF) २०२५ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ९१ वे, मुंबई विद्यापीठाला ९२ वे स्थान मिळाले, तर राज्यातील इतर आठ विद्यापीठांचे दर्जा घसरला आहे.
स्थायी प्राध्यापकांच्या अभावामुळे शिक्षण व संशोधनाची गुणवत्ता कमी झाली आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. सध्या विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये २२ हजार कंत्राटी व तासिक प्राध्यापक कार्यरत आहेत, ज्यांना फक्त ११ महिन्यांसाठी नियुक्ती दिली जाते व ३०–४० हजार रुपये मर्यादित वेतन मिळते.
सर्वोच्च न्यायालयाने समान कामासाठी समान वेतन सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले तरीही शासनाकडून ठोस पाऊले उचलले गेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी ८० टक्के पदभरतीची घोषणा केली होती. संघटनेच्या सहसचिव डॉ. कल्याण साखरकर यांनी सांगितले की, राज्य सरकारने पुढील दोन आठवड्यात भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी निर्णय काढावा.

Comments are closed.