राज्यातील ३६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि कनिष्ठ निवासी या एकूण ११०० पदांसाठी लवकरच मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने या भरतीस १४ ऑक्टोबर रोजी अधिकृत मंजुरी दिल्याने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जालना येथे नव्याने स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला या भरतीतून २५ ट्युटर आणि ४० कनिष्ठ निवासी अशा ६५ पदांचा लाभ मिळणार आहे. या पदांमुळे केवळ विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल प्रशिक्षणाची संधी वाढणार नाही, तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्यसेवांनाही मोठी चालना मिळणार आहे.
राज्यातील वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थीसंख्या वाढल्यामुळे शिक्षकांची कमतरता तीव्रतेने जाणवत होती. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने ठरविलेल्या मानकांनुसार १०० विद्यार्थ्यांसाठी किमान २५ प्रशिक्षक, तर २५० विद्यार्थ्यांसाठी ४३ प्रशिक्षक आणि कनिष्ठ निवासी नियुक्त असणे आवश्यक आहे. त्यामुळे या भरतीमुळे राज्यातील वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेत लक्षणीय वाढ होणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे, की या नव्या पदभरतीमुळे विद्यार्थ्यांना प्रयोगशाळांतील प्रशिक्षण अधिक सखोलपणे घेता येईल, क्लिनिकल अनुभव वाढेल, तसेच संशोधनासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळेल. यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक कौशल्यांबरोबरच वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन संस्कृतीलाही चालना मिळणार आहे.
अधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी यांनी सांगितले, की “जालना वैद्यकीय महाविद्यालयात सुरू असलेल्या उभारणीच्या कामात वेग आला आहे. पुढील दोन वर्षांत स्वतःच्या इमारतीत स्थलांतर अपेक्षित असून, या भरतीमुळे शैक्षणिक तसेच रुग्णसेवा क्षेत्रात नवी ऊर्जा मिळेल.”
ही भरती केवळ रोजगाराची संधी नसून, राज्यातील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेच्या दर्जात सुधारणा करणारा ऐतिहासिक टप्पा ठरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Comments are closed.