राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातून तब्बल ३ लाख ८० हजार १८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये दहावीचे २ लाख ६ हजार ५०१, तर बारावीचे १ लाख ७३ हजार ६८८ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. मंडळामार्फत १० फेब्रुवारीपासून बारावीची, तर २० फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी राज्य मंडळाने सप्टेंबर महिन्यापासूनच ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती. विविध कारणांमुळे या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली होती तसेच विलंब व अतिविलंब शुल्क आकारून विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली. या कालावधीत नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने नोंदणीकृत झाले आहेत.
नोंदणीकृत विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण झाल्या असून आता लेखी परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. नाशिक विभागात दहावीची परीक्षा ४९३ केंद्रांवर, तर बारावीची परीक्षा २८५ केंद्रांवर होणार आहे. जिल्हानिहाय विचार करता, दहावीकरिता नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक २२४ केंद्रे असून, जळगावमध्ये १४७, धुळ्यात ७२ आणि नंदुरबारमध्ये ५० केंद्रांचा समावेश आहे. तर बारावीकरिता नाशिकमध्ये १२९, जळगावमध्ये ८२, धुळ्यात ४६ आणि नंदुरबारमध्ये २८ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
पावणे चार लाख विद्यार्थ्यांची ही परीक्षा सुरळीत व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी मंडळाकडून सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या असून, परीक्षा काळात आवश्यक त्या सर्व सुविधा व दक्षता घेतली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments are closed.