दिवाळी फक्त आठवड्यापुरती उरली असतानाही, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करायला विसर पडला आहे. यामुळे राज्यातील प्रवेश प्रक्रियांवर मोठा परिणाम होतोय.
दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे पॉलिटेक्निक व आयटीआयमध्ये प्रवेश, तर बारावीच्या गुणांवर आधारित व्यावसायिक व बिगरव्यावसायिक पदवी अभ्यासक्रम सुरू होतात. वेळापत्रक न आल्याने, इतर सीईटी सेल किंवा उच्च शिक्षणाशी संबंधित यंत्रणांना प्रवेश परीक्षा घेण्यात अडचणी येतात, हे राज्य मंडळाला अजून लक्षात आलेले नाही.
सुमारे ३० लाख विद्यार्थी वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचवेळी, सीबीएसई ने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वेळापत्रक आधीच जाहीर केले आहे.
विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या या परीक्षांनंतर, उच्च शिक्षणाच्या संधी खुल्या होतात. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांनाच परीक्षेचे वेळापत्रक लवकर मिळणे आवश्यक आहे, जे अभ्यास व तयारीसाठी महत्वाचे आहे.
दर वर्षी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर, साधारण ऑगस्टमध्ये मंडळाकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर केले जाते. गेल्या वर्षीही याच कालावधीत वेळापत्रक जाहीर झाले होते. आता वेळापत्रक तयार असून, काही प्रशासकीय कारणास्तव विलंब होत आहे. अधिकारी म्हणतात, लवकरच वेळापत्रक जाहीर होईल.