कोकण विभागातील जिल्हा ग्रंथालयांमध्ये दीर्घकाळापासून नवीन भरती न झाल्यामुळे विविध पदे रिक्त आहेत. सध्या सहा जिल्ह्यांमध्ये मिळून १० पदे रिक्त असून, त्यात सर्वाधिक रिक्त जागा पालघर जिल्ह्यात आहेत.
त्यानंतर रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही पदे भरलेली नाहीत, ज्यामुळे ग्रंथालयांच्या प्रशासनिक आणि तांत्रिक कामकाजावर परिणाम होत आहे.
कोकण विभागात एकूण ५१९ शासकीय मान्यताप्राप्त ग्रंथालये कार्यरत आहेत. रत्नागिरीत १४५, सिंधुदुर्गात १२१, ठाण्यात ९९, रायगडात ६२, मुंबई उपनगरात ३४, पालघरात ३४ आणि मुंबई शहरात २३ ग्रंथालये कार्यरत आहेत. विभागातील ८ जिल्हा ग्रंथालयांमध्ये एकूण ८ ग्रंथालय अधिकारी, ८ सहाय्यक ग्रंथपाल, १४ क्लार्क आणि १२ शिपाई पदे मंजूर आहेत, त्यापैकी १० पदे सध्या रिक्त आहेत.
जिल्हानिहाय पाहता, पालघर जिल्ह्यात ५ पदांपैकी ३, रायगड जिल्ह्यात २, सिंधुदुर्गात २ आणि रत्नागिरीत २ पदे रिक्त आहेत, तर ठाणे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये सर्व पदे भरलेली आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील वाचनालयांना पुरेसा मनुष्यबळ आणि साधनसामग्रीची गरज आहे, अन्यथा वाचन संस्कृतीला चालना देणे कठीण होईल.
गेल्या काही वर्षांपासून नवीन ग्रंथालयांना शासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया स्थगित आहे; २०१२ पासून आजतागायत एकही नवीन ग्रंथालय मान्यताप्राप्त झालेले नाही. या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील अनेक जिल्ह्यांतील वाचनप्रेमी, ग्रंथालय संघटना आणि स्थानिक प्रतिनिधींनी रिक्त पदे लवकर भरून नवीन ग्रंथालयांना मान्यता द्यावी, अशी मागणी केली आहे.

Comments are closed.