महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने २० फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर एकाच वेळी तब्बल १० बोगस विद्यार्थी परीक्षा देताना आढळून आले, त्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
मराठी विषयाच्या परीक्षेदरम्यान ओळखपत्र तपासणी करताना हा प्रकार समोर आला. नंदेश्वर येथील बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नऊ विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीचा समावेश होता. हे विद्यार्थी मूळचे मंगळवेढ्यातील सुतार इंटरनॅशनल स्कूल, लक्ष्मी दहिवडी येथील असल्याचे स्पष्ट झाले.
केंद्रप्रमुखांच्या तक्रारीनंतर संबंधित बोगस विद्यार्थ्यांविरोधात बोर्डाच्या नियमांनुसार तसेच पोलिसांकडे रीतसर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे कॉपीमुक्त परीक्षेच्या अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दहावीच्या परीक्षांमध्ये आजही अशा गैरप्रकारांचे प्रमाण असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Comments are closed.