सीबीएसईकडून दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता १०वी आणि १२वीच्या बोर्ड परीक्षांची प्रवेशपत्रे अधिकृतपणे जाहीर केली आहेत. ही प्रवेशपत्रे सीबीएसईच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली असून, शाळांमार्फत ती डाउनलोड करता येणार आहेत.

शाळेतील अधिकृत शिक्षकांनी सीबीएसईची वेबसाइट cbse.gov.in किंवा https://www.cbse.gov.in/ येथे भेट देऊन लॉगिन क्रेडेन्शियल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे डाउनलोड करावीत, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी थेट लॉगिन करून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार नाही.
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी प्रथम सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर जावे. त्यानंतर होमपेजवरील ‘परीक्षा संगम’ या विभागावर क्लिक करावे. पुढे ‘CBSE 10th & 12th Admit Card 2026’ या लिंकवर क्लिक करून लॉगिन तपशील भरावेत. लॉगिन झाल्यानंतर प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, जे डाउनलोड करून प्रिंट काढता येईल.
दरम्यान, सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा १७ फेब्रुवारी २०२६ पासून देशभरातील निश्चित परीक्षा केंद्रांवर सुरू होणार आहेत. दहावीच्या परीक्षा ११ मार्च २०२६ पर्यंत, तर बारावीच्या परीक्षा ४ एप्रिल २०२६ पर्यंत चालणार आहेत. दोन्ही वर्गांच्या परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेतल्या जाणार असून, विषयानुसार परीक्षेच्या वेळेत बदल असू शकतो. काही विषयांसाठी परीक्षा सकाळी १०:३० ते दुपारी १:३०, तर काही विषयांसाठी १०:३० ते १२:३० या वेळेत पार पडणार आहेत.
विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेशपत्र मिळवून त्यावरील सर्व तपशील काळजीपूर्वक तपासावेत, असे आवाहन सीबीएसईकडून करण्यात आले आहे.

Comments are closed.