नागपूर महापालिकेच्या शाळांमधून दहावी उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना आता अकरावी आणि बारावीच्या शिक्षणासाठी मोठा आधार मिळणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मंजुरी दिलेल्या या योजनेतून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दोन टप्प्यांमध्ये दिली जाईल. यावर्षी मार्च महिन्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे.

महापालिकेच्या शाळांमधून गुणवत्ताप्राप्त ५० विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी दोन टप्प्यांमध्ये पन्नास हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल. ही मदत दहावीनंतर उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिली जाणार असून, त्यामुळे अकरावी व बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणात मोठा प्रोत्साहन मिळेल.
महापालिकेच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी, शाळेतील वातावरण अभ्यासाला पूरक व आनंददायी करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच अंतर्गत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना पन्नास हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. नागपूर महापालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमांच्या एकूण २८ शाळांमध्ये ही मदत लागू होणार आहे.
मार्च २०२५ मध्ये झालेल्या माध्यमिक परीक्षेत महापालिकेच्या शाळांमध्ये एकूण निकाल टक्केवारी ९०.२८% होती. पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला ९४% गुण मिळाले आहेत. मनपा आयुक्तांनी गुणवत्तायादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते.
सध्या मनपातर्फे दहावीचे शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये मराठी-सात, हिंदी-११, उर्दू-नऊ आणि इंग्रजी-एक अशा एकूण २८ शाळा आहेत. यातील ११ शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळत आहे. विद्यार्थ्यांना कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात शिकताना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून ही आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
मुलींना वार्षिक भत्ता — महापालिकेच्या शाळांमध्ये मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढावे यासाठी मुलींना चार हजार रुपये वार्षिक उपस्थिती भत्ता दिला जात आहे. संगणक प्रशिक्षण, शिक्षण महोत्सव, क्रीडा महोत्सव, डिजिटल बोर्ड, कम्प्युटर लॅब व सायन्स लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. मनपा शाळांनी खासगी शाळांशी स्पर्धा राखत गुणवत्तेत एक पाऊल समोर टाकले आहे.

Comments are closed.