लाडकी बहिण योजनेत मोठा बदल; एप्रिलमध्ये मिळणार ३,००० रुपये, सोलापुरात लाखो महिला अपात्र! | ₹3,000 in April for Ladki Bahin Beneficiaries!

₹3,000 in April for Ladki Bahin Beneficiaries!

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना जानेवारीनंतर निधी मिळालेला नाही. आता नवीन आर्थिक वर्षात पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे प्रत्येकी १,५०० रुपये असे एकूण ३,००० रुपये १५ एप्रिलपूर्वी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यासाठी योजनेच्या सर्व निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. सोलापूर जिल्ह्यात सुरुवातीला या योजनेचे ११ लाख २० हजार ५६३ लाभार्थी होते, परंतु निकषांनुसार तपासणी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात लाभार्थी अपात्र ठरले आहेत.

₹3,000 in April for Ladki Bahin Beneficiaries!

सरकारकडून लाभार्थ्यांची सखोल पडताळणी करण्यात आली असून केंद्र किंवा राज्याच्या इतर वैयक्तिक लाभ योजनांचे लाभार्थी, पुरुष लाभार्थी, एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी, चारचाकी वाहन असलेले कुटुंब, २१ वर्षांखालील व ६५ वर्षांवरील महिला यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. याशिवाय सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते. सोलापूर जिल्ह्यात सुमारे १.१३ लाख महिलांनी ई-केवायसीच केले नाही, तर ९८ हजारांहून अधिक महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे.

सरकारने ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती. त्यानंतर काही महिलांच्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र ही मुदत फक्त ई-केवायसीमध्ये चुका झालेल्या लाभार्थ्यांसाठी लागू असून ज्यांनी ई-केवायसीच केले नाही, त्यांना पुढे या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, योजनेच्या नियमांनुसार पात्र महिलांना वयाच्या ६५ वर्षांपर्यंत दरमहा आर्थिक मदत दिली जाणार आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार अंगणवाडी सेविकांमार्फत सर्व लाभार्थ्यांची निकषांनुसार पडताळणी करण्यात आली असून त्याचा अहवाल जिल्हा महिला व बालविकास कार्यालयामार्फत शासनाला पाठविण्यात आला आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले की, सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सुमारे तीन लाख महिला अपात्र ठरल्या आहेत.

याशिवाय ई-केवायसी तपासणीनंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या महिलांची नावेही यादीतून वगळली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निकषांमुळे सोलापूर जिल्ह्यातील दीड लाखांहून अधिक महिला आणखी अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी काळात लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.