केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठीची खात्रीशीर आणि लोकप्रिय बचत योजना मानली जाते. मुलीच्या शिक्षण, करिअर व विवाहासाठी आर्थिक नियोजन करण्यासाठी ही योजना पालकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. सरकारी हमी, आकर्षक व्याजदर आणि करसवलत यामुळे या योजनेला मोठी पसंती मिळते.
१० वर्षांखालील वयाच्या मुलीच्या नावावर या योजनेत खाते उघडता येते. वर्षाला किमान २५० रुपये ते कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. गुंतवणूक फक्त १५ वर्षे करावी लागते; मात्र खाते २१ वर्षांपर्यंत सुरू राहते. शेवटच्या सहा वर्षांत कोणतीही रक्कम भरावी लागत नाही, तरीही जमा रकमेवर व्याज वाढत राहते.
सध्या या योजनेवर ८.२ टक्के वार्षिक व्याजदर दिला जातो. एखादा पालक दरमहा २००० रुपये जमा करत असेल, तर वर्षाला २४,००० रुपये आणि १५ वर्षांत एकूण ३.६ लाख रुपये गुंतवणूक होते. या रकमेवर चक्रवाढ व्याज लागून २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अंदाजे ९.६ ते १० लाख रुपये मिळू शकतात.
या योजनेत गुंतवलेली रक्कम सुरक्षित असून, १८ वर्षांनंतर मुलीच्या शिक्षणासाठी जमा रकमेपैकी ५० टक्के रक्कम काढण्याचीही मुभा आहे. पूर्ण रक्कम २१ वर्षांनंतर मिळते आणि ती पूर्णपणे करमुक्त असते.
सरकारी हमी, जोखीममुक्त गुंतवणूक, जास्त व्याजदर आणि टॅक्स फ्री मॅच्युरिटी यामुळे सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मजबूत आर्थिक आधार ठरत आहे.

Comments are closed.