दहावीला दोन परीक्षा, पहिली अनिवार्य!-CBSE Two-Exam Rule Explained!
CBSE Two-Exam Rule Explained!
दहावीची बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याबाबत CBSE ने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. हे धोरण विद्यार्थ्यांना नापास टाळण्यासाठी नसून, केवळ गुण सुधारण्याची अतिरिक्त संधी देण्यासाठी असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्या बोर्ड परीक्षेला बसणे अनिवार्य राहणार आहे.
सीबीएसईनुसार, पहिल्या परीक्षेत किमान तीन विषयांची परीक्षा न दिल्यास संबंधित विद्यार्थ्याला दुसऱ्या बोर्ड परीक्षेला बसण्याची परवानगी मिळणार नाही. काही पालकांनी पहिल्या परीक्षेला अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांनाही दुसऱ्या परीक्षेची संधी द्यावी, अशी मागणी केली होती; मात्र ती फेटाळण्यात आली आहे.
पहिल्या परीक्षेत एक किंवा दोन विषयांत कंपार्टमेंट आलेल्या विद्यार्थ्यांना मात्र ‘कंपार्टमेंट श्रेणी’ अंतर्गत दुसऱ्या परीक्षेला बसण्याची मुभा दिली जाईल. मात्र, दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अतिरिक्त विषय देण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे.
सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, सर्व पात्र आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र आणि भाषा या विषयांपैकी कोणत्याही तीन विषयांत दुसऱ्या परीक्षेद्वारे गुण सुधारण्याची संधी मिळेल. मात्र, पहिल्या परीक्षेत तीन किंवा अधिक विषय न दिल्यास विद्यार्थ्याला ‘अत्यावश्यक पुनरावृत्ती’ श्रेणीत टाकण्यात येईल आणि त्याला पुढील वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या मुख्य परीक्षेलाच बसावे लागेल.

Comments are closed.