भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे सरकत असताना, परदेशी दिग्गज कंपन्यांचा देशावरील विश्वास मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो. मायक्रोसॉफ्ट आणि अमेझॉन या दोन्ही जागतिक टेक कंपन्यांनी तब्बल ४ लाख ७२ हजार कोटी रुपयांची भव्य गुंतवणूक भारतात करण्याची घोषणा करून रोजगाराच्या नव्या दालनांचे दरवाजे उघडले आहेत.
अमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस यांनी 2030 पर्यंत 35 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचा मोठा संकल्प ठेवला आहे. नवी दिल्लीतील ‘अमेझॉन संभव’ परिषदेत ही मोठी घोषणा करण्यात आली. डिजिटल अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाधारित वाढ पुढील दशकात रोजगारनिर्मितीचे इंजिन ठरणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
अमेझॉनने पुरवठा केंद्रे, डेटा सेंटर्स, डिजिटल पेमेंट्स आणि लॉजिस्टिक्स यामध्ये मोठी गुंतवणूक आधीच केली असून, 2030 पर्यंत १० लाखांहून अधिक थेट- अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. उत्पादन, पॅकेजिंग, वितरण आणि व्यवसाय विकास या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे.
दरम्यान, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनीही भारतात 17.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच आशियातील सर्वात मोठी गुंतवणूक जाहीर केली. ही गुंतवणूक भारतीय डिजिटल पायाभूत सुविधा आणि एआय-आधारित क्षमतांना नवी दिशा देणार आहे.
गेल्या १५ वर्षांत अमेझॉनने लघुउद्योगांना सक्षम करण्यासाठी 40 अब्ज डॉलर्स गुंतवले असल्याचे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अमित अग्रवाल यांनी सांगितले. 2030 पर्यंत भारताची ई-कॉमर्स निर्यात 20 अब्ज डॉलर्सवरून थेट 80 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

Comments are closed.