राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील १२,७८० तासिका तत्वावरील अध्यापकांचे (सीएचबी) मानधन दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सुमारे ७४ कोटी १५ लाख रुपये देयके सबंधित कोषागार कार्यालयात सादर करण्यात आली आहेत. यामुळे राज्यातील प्राध्यापकांसाठी मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
सध्या सीएचबी प्राध्यापकांचे मानधन वेळेत मिळावे, हा आदेश उच्च शिक्षण संचालनालयाने सर्व सहसंचालक व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दिला होता. याआधी नागपूर, कोल्हापूर विभागातील काही प्राध्यापकांचे वेतन अद्याप अडचणीत होते, अशी माहिती महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटनेने दिली होती.
यावेळी नवीन शैक्षणिक धोरणानुसार भारतीय ज्ञान परंपरा अंतर्गत विद्यार्थ्यांना नवनवीन विषय शिकवले जात आहेत. मात्र, या नव्या विषयांचे मानधन अद्याप देय नसल्याचे सहसंचालक कार्यालयाकडून सांगितले जात होते, असे संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाथ्रीकर यांनी नमूद केले.
उच्च शिक्षण संचालनालयाने तीन ते चार आठवड्यांपासून ऑनलाईन व ऑफलाईन बैठका घेऊन सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलसचिवांना सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीला वेळेत मान्यता द्यावी, तसेच विभागीय सहसंचालकांनी महाविद्यालयांकडून वेतन देयके मागवून कोषागार कार्यालयात वेळेत सादर करणे सुनिश्चित केले.
याप्रकारच्या नियोजनामुळे राज्यातील सर्व सीएचबी प्राध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार आहे. उच्च शिक्षण विभागाने हे सुनिश्चित केले आहे की प्राध्यापकांना नेहमीच हक्काच्या मानधानापासून वंचित राहावे लागणार नाही.
सप्टेंबरमध्ये अनेक विद्यापीठांनी सीएचबी प्राध्यापकांना मान्यता न दिल्यामुळे काही प्राध्यापक वेतनाच्या प्रतीक्षेत होते. त्यानंतर शिक्षण विभागाने विद्यापीठांना तात्काळ मान्यता देण्याचे व मानधन वेळेत अदा करण्याचे आदेश दिले.
डॉ. शैलेंद्र देवळाणकर, प्र.संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले की, “गेल्या तीन ते चार आठवड्यांपासून उच्च शिक्षण संचालनालय स्तरावरून सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलसचिवांना या अध्यापाकांच्या नियुक्तीस विहित वेळेत मान्यता बहाल करणे, तसेच सर्व विभागीय सहसंचालकांनी सबंधित महाविद्यालयांकडून सीएचबी अध्यापकांची वेतन देयके मागवून घेणे, कोषागार कार्यालयास वेळेत देयके सादर करणे यासाठी वेळोवेळी ऑनलाईन/ऑफलाईन बैठका घेतल्या गेल्या, त्याचा हा परिणाम आहे.”
या निर्णयामुळे राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील १२,७८० सीएचबी प्राध्यापकांसाठी दिवाळी गोड झाली आहे. आता त्यांना त्यांच्या हक्काच्या मानधनाची सुरक्षितता मिळाली असून आर्थिक स्थिरता कायम राहणार आहे.