देशातील पहिलाच उपक्रम, लष्करातील जवानांसाठी आता ‘स्कीन बँक’ | Skin Bank for Army Jawan

0

Skin Bank for Army Jawan:  भारतीय लष्कराने प्रथमच जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘स्कीन बैंक’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दुर्घटनेत गंभीररीत्या भाजल्या गेलेल्यांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपचार करणे शक्य होईल. त्वचेशी संबंधित अन्य गंभीर आजारांवर देखील या माध्यमातून उपचार करता येणार असल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या स्कीन बँकेमध्ये उच्चशिक्षित वैद्यकीय संशोधक आणि डॉक्टर, प्लॅस्टिक सर्जन, उती अभियंते आणि विशेष कौशल्यप्राप्त तंत्रज्ञांचा भरणा असेल असे संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे

लष्करी रुग्णालय (संशोधन आणि संदर्भ) यांच्याकडून ही स्कीन बैंक सुरू करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. लष्करी दले वैद्यकीय सेवेअंतर्गत प्रथमच अशा प्रकारची सेवा सुरू केली जात आहे. या बँकेमध्ये विविध प्रकारच्या त्वचेचे संकलन करण्याबरोबरच त्यावर प्रक्रियाही करण्यात येईल. पुढे हीच त्वचा देशभरातील लष्कराच्या वैद्यकीय केंद्रांना उपलब्ध करून देण्यात येईल.

या स्कीन बँकेमुळे लष्कराचे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना अत्याधुनिक त्वचा प्रत्यारोपण उपचारांचा लाभ घेता येईल. या वैद्यकीय सेवेदरम्यान उच्च दर्जाची सुरक्षा आणि गुणवत्ता यांचे पालन करण्यात येईल. येथील त्वचेची विश्वासार्हता कायम राहावी म्हणून आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू असेही लष्कराकडून सांगण्यात आले.

त्वचेच्या ऊतींचा मोठा स्रोत – What is Skin Bank for Army Jawan

त्वचेच्या ऊतींचा एक मोठा स्त्रोत आमच्याकडे उपलब्ध असून त्यामुळे रुग्णांवर अधिक प्रभावीरीत्या उपचार करता येऊ शकतील यामुळे गंभीर जखमी झालेल्या जवानांचे पुनर्वसन देखील होऊ शकेल, असे लष्करी रुग्णालयाचे (संशोधन आणि संदर्भ) ले. जनरल अजित नीलकंठन यांनी सांगितले

या स्कीन बँकेच्या माध्यमातून भारतीय लष्कराची आपल्या जवानांप्रतीची कटिबद्धता दिसून येते. यामुळे भारतीय जवानांना अधिक चांगले उपचार मिळू शकतील तसेच गंभीररीत्या जखमी झालेल्यांना देखील उपचाराच्या अनुषंगाने याचा मोठा लाभ होईल.
– अरिंदम चॅटर्जी, सशस्त्र दले वैद्यकीय सेवा विभागाचे महासंचालक, कर्नल कमांडंट, ले. जनरल

Leave A Reply

Your email address will not be published.