आता राज्यात वाहन परवान्यासाठी १९ निकष! – New Driving Licence Rules 2024
राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रस्ते अपघाताला काही प्रमाणात आळा बसावा यासाठी प्रगत देशांच्या धर्तीवर नवीन वाहन चालक परवाना मिळविताना १९ प्रकारचे निकष पूर्ण करावे लागणार आहेत. राज्याच्या परिवहन विभागाच्या वतीने यासाठी १७ ठिकाणी स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग तयार केले जात असून २३ ठिकाणी वाहन योग्यता प्रमाणपत्र केंद्रे उभारली जात आहेत.
येत्या दोन महिन्यांत हे स्वयंचलित परवाना तपासणी मार्ग व केंद्रे सुरू केली जाण्याची शक्यता आहे अशी माहिती परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया यांनी दिली. राज्यात रस्ते अपघातात १५ हजारापेक्षा जास्त चालकांचा मूत्यू होत आहे ही चिंतेची बाब ठरली आहे. केंद्रीय रस्ते व परिहवन मंत्रालयाने गेल्या वर्षी सर्व प्रकारचे वाहन चालक परवाना देताना नियमात बदल केले आहेत. नवीन परवाना घेणाऱ्या चालकाने ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याला देण्यात आलेल्या वेळेनुसार चाचणी द्यावी लागत आहे. राज्य सरकारच्या परिवहन विभागाने ३५ वर्षांनंतर वाहन परवाना देण्याच्या प्रक्रियेत बदल केला आहे. केवळ वाहन चालवता येत आहे हा निकष वाहन परवाना देण्यासाठी पुरेसा नाही. वाहन परवाना देण्यात परिवहन विभागाचा कोणताही हस्तक्षेप राहणार नाही अशी प्रणाली या नवीन स्वयंचलित वाहन परवाना पद्धतीत अवलंबली जाणार आहे.