दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी दिलासा; एकनाथ शिंदेंकडून विशेष विमानांची व्यवस्था! | Special Flights Arranged for Stranded Maharashtra Citizens!

Special Flights Arranged for Stranded Maharashtra Citizens!

मध्य पूर्वेत इराण–इस्रायल–अमेरिका संघर्षामुळे हवाई क्षेत्रावर परिणाम झाल्याने दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी तातडीने पुढाकार घेत विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. या उपक्रमांतर्गत Star Air कंपनीची दोन विमाने फुजैरा विमानतळावरून मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. संकटात अडकलेल्या नागरिकांशी स्वतः संवाद साधून त्यांना सुरक्षित परत आणण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते.

Special Flights Arranged for Stranded Maharashtra Citizens!

मिळालेल्या माहितीनुसार, VTGSO हे विमान दुपारी ३.३० वाजता, तर VTGSH हे विमान ४.३० वाजता फुजैरा विमानतळावरून उड्डाण घेणार आहे. या दोन्ही विमानांद्वारे एकूण १६४ प्रवासी संध्याकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत Chhatrapati Shivaji Maharaj International Airport, मुंबई येथे पोहोचण्याची शक्यता आहे. या प्रवाशांमध्ये Indira School of Business Studies, पुणे येथील ८४ विद्यार्थी तसेच ठाणे, मुरबाड आणि अहिल्यानगर परिसरातील इतर नागरिकांचा समावेश आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच दुबईत अडकलेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला होता. “तुम्ही सर्व सुरक्षित आहात, काळजी करू नका. महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्हाला सुरक्षित मायदेशी परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असा शब्द त्यांनी दिला होता. त्यानंतर संबंधित यंत्रणांशी सातत्याने संपर्क साधून या १६४ प्रवाशांच्या परतीचा मार्ग मोकळा करण्यात आला.

दरम्यान, दुबईला पर्यटनासाठी गेलेल्या कोल्हापूरच्या २९ प्रवाशांचा गटही सुरक्षितपणे मायदेशी परतला आहे. या प्रवाशांनी दुबईतील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण असल्याचे सांगितले. त्यांच्या हॉटेलजवळच स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचा थरारक अनुभव त्यांनी सांगितला. मात्र अखेर सुरक्षितपणे भारतात परतल्याचा आनंद व्यक्त करत त्यांनी सरकारचे आभार मानले.

Comments are closed.