वर्षभर सतत प्रवाशांनी खचाखच भरलेल्या नागपूर-पुणे-नागपूर रेल्वे मार्गावर प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच या मार्गावर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ जलद गती ट्रेन सुरू होणार आहे. खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी याचे संकेत दिले आहेत.
हडपसर येथून सुरू होणाऱ्या हडपसर-जोधपूर एक्स्प्रेस आणि एमजीआर चेन्नई सेंट्रल-भगत की कोठी एक्स्प्रेस या गाड्यांचे उद्घाटन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दोन दिवसांपूर्वी केले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, पुणे-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे.
वैष्णव यांचे हे वक्तव्य नागपूर-पुणे-नागपूर मार्गावर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी खूपच दिलासादायक आहे. कारण, या मार्गावर दररोज हजारो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. १४ ते १६ तासांचा हा प्रवास साधारणतः रेल्वेनेच केला जातो. या मार्गावर नेहमीच तिकीट मिळवण्यासाठी धडपड करावी लागते. जे मिळेल ते तिकीट घेऊन प्रवासी प्रवास करतात, तर काही जण खासगी बसचा पर्याय निवडतात. पण, बसने प्रवास करताना वेळ आणि खर्च दोन्ही जास्त लागतात. शिवाय बसमधला प्रवास खूपच कंटाळवाणा ठरतो.
म्हणूनच नागपूर-पुणे मार्गावर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू व्हावी, अशी मागणी प्रवाशांकडून मागील दोन वर्षांपासून होत होती. प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींनीही रेल्वे मंत्रालयाकडे याबाबत निवेदन दिले होते. मात्र, वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा अधिकार पूर्णपणे रेल्वे मंत्रालयाकडे असल्याने अधिकाऱ्यांकडून हतबलता व्यक्त केली जात होती. आताच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यात चर्चा झाल्यामुळे आता नागपूर-पुणे-नागपूर वंदे भारत सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्याचे संकेत मिळत आहेत.
नागपूरहून धावणारी चौथी वंदे भारत:
सर्वप्रथम अडीच वर्षांपूर्वी नागपूर-जबलपूर-नागपूर ही वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली होती. त्यानंतर दुसरी वंदे भारत नागपूर-उज्जैन-इंदोर मार्गावर सुरू झाली. नंतर गेल्या वर्षी नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली. आता नागपूर-पुणे-नागपूर वंदे भारत सुरू झाल्यास, नागपूरहून धावणारी ही चौथी वंदे भारत एक्स्प्रेस ठरेल. प्रवाशांची ही गाडी लवकर सुरू व्हावी, अशी तीव्र इच्छा आहे.
मोठा प्रतिसाद मिळणार:
गेल्यावर्षी सुरू झालेली नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस २२ कोचची असूनही अनेक महिने रिकामी धावत होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला आर्थिक नुकसान सहन करावे लागले. नंतर रेल्वे प्रशासनाने ८ कोच कमी केले, तरीदेखील तिला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. परंतु, नागपूर-पुणे-नागपूर वंदे भारत सुरू झाल्यास मात्र, ही गाडी वर्षभर भरभरून धावेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा फायदा तर होईलच, पण रेल्वे प्रशासनालाही उत्पन्नाच्या रूपाने मोठा फायदा मिळणार आहे.