महाराष्ट्रातील सरकारी व अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक होण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. राज्य सरकारने उच्च शिक्षण विभागात ५,५०० पेक्षा अधिक प्राध्यापक पदांच्या भरतीला मंजुरी दिली आहे. ही माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.
राज्यात एकूण ३१,१८५ मंजूर प्राध्यापक पदे असून त्यापैकी १९,२६७ पदे भरलेली आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर ताण येत आहे. त्यामुळे सरकारने ५,०१२ पदे आणि इतर रिक्त पदांसह मिळून सुमारे ५,५०६ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भरती प्रक्रियेला औपचारिक मंजुरी दिली असून राज्यातील महाविद्यालयांमधील अध्यापन सुरळीत ठेवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होईल आणि पात्र उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार संधी दिली जाईल, असेही सरकारने स्पष्ट केले.
तसेच प्राध्यापकांचे सध्याचे निवृत्ती वय ६० वर्षे असून ते ६२ वर्षांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार पदांचे पुनर्वितरण करून महाविद्यालयांकडून यादी व NOC मिळाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू केली जाईल.
सरकारचे लक्ष्य म्हणजे ही संपूर्ण प्राध्यापक भरती प्रक्रिया जून २०२६ पूर्वी पूर्ण करणे, ज्यामुळे राज्यातील महाविद्यालयांमधील रिक्त पदांची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.