महाज्योती संस्थेने शैक्षणिक वर्ष २०२५-२७ साठी आयोजित जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटी या प्रवेश परीक्षांसाठीच्या ऑनलाइन प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. या निवड प्रक्रियेत राज्यातील सुमारे ३,५०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, यामध्ये विविध सामाजिक प्रवर्गातील विद्यार्थी समाविष्ट आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि तंत्रज्ञान शाखांसाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. निवड प्रक्रियेसाठी १६ मे ते १५ सप्टेंबर या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात आले होते.
विद्यार्थ्यांची निवड संवर्गनिहाय आरक्षण, समांतर आरक्षण आणि दहावीच्या गुणांच्या गुणवत्तेच्या आधारे करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाज्योतीकडून टॅबलेट (Tab) वितरण करण्यात येणार असून, त्याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना संस्थेच्या संपर्क केंद्राद्वारे देण्यात येईल.
या प्रशिक्षण कार्यक्रमात ओबीसी – २,०६५, एनटी-सी – ३८५, व्हीजे – ३५०, एनटी-बी – २८०, एनटी-डी – २१० आणि एसबीसी – २१० विद्यार्थी निवडले गेले आहेत. विशेष म्हणजे, ९०% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणासाठी पात्रता मिळाली आहे.
‘महाज्योती’च्या या उपक्रमामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन प्रशिक्षण आणि करिअर मार्गदर्शनाची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

Comments are closed.