महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माध्यमातून गट ‘ब’च्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदभरतीसाठी परीक्षा घेतली जाते. फेब्रुवारी 2024 मध्ये या परीक्षेसाठी राज्य सरकारकडून तब्बल 441 पदांसाठी मागणीपत्र पाठवण्यात आले होते.
मात्र, राज्यातील निवडणुकांमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये फक्त 216 जागांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली, ज्यामुळे स्पर्धा परीक्षार्थींमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
पदसंख्या कमी करण्यामागे सरकारचे कारण काय?
पोलिस उपनिरीक्षक पदांसाठी पूर्वी 441 जागांची मागणी होती, मात्र अंतिम जाहिरातीत केवळ 216 पदांचा समावेश करण्यात आला. याबाबत विद्यार्थ्यांनी सरकारकडे विचारणा केली असता, “लाडकी बहीण योजनेमुळे सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही, त्यामुळे भरती प्रक्रियेत कपात करावी लागली”, असे उत्तर देण्यात आले.
विद्यार्थ्यांचा आक्षेप : हजारो पदे रिक्त असताना संधी कमी का?
राज्यात 2,951 पोलिस उपनिरीक्षक पदे रिक्त असूनही, फक्त 216 जागांची भरती निघाल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्पर्धा परीक्षेसाठी तीन ते चार लाख उमेदवार अर्ज करतात, मात्र उपलब्ध जागा अत्यल्प असल्याने हजारो तरुणांचे करिअर धोक्यात येत आहे